माता शैलपुत्री माहिती
Sharadiy Navratri 2025 : नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजली जाणारी देवी म्हणजे माता शैलपुत्री. “शैल” म्हणजे पर्वत आणि “पुत्री” म्हणजे कन्या. हिमालयाची कन्या म्हणून त्यांना शैलपुत्री म्हणतात.

जन्मकथा
सतीने दक्ष प्रजापतीच्या यज्ञात देहत्याग केल्यानंतर, पुढील जन्मात त्या हिमालयाच्या घरी शैलपुत्री म्हणून जन्मल्या. ह्याच देवीने नंतर भगवान शंकराशी विवाह केला.
स्वरूप
माता शैलपुत्री ह्या दोन हातांनी सुशोभित आहेत. उजव्या हातात त्रिशूल व डाव्या हातात कमळ आहे. त्या वृषभ (नंदी बैल) या वाहनावर आरूढ आहेत. त्यांच्या कपाळावर अर्धचंद्र आहे.
महत्त्व
नवरात्रीत पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केल्याने साधकाची साधना सुरू होते. त्या शक्ती, संयम आणि स्थिरतेचं प्रतीक मानल्या जातात. साधकाला आत्मविश्वास, धैर्य आणि जीवनात नवी ऊर्जा मिळते.
* बीज मंत्र *
ॐ देवी शैलपुत्र्यै नमः॥
नवरात्रीत शैलपुत्री देवीची पूजा मांडणी कशी करावी
भागवत पुराण मध्ये पण माता शैलपुत्रीच्या पूजेबद्दल माहिती दिली आहे. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेची पूजा करण्यासाठी सकाळी लवकर उठावं कारण पूजेची सुरुवात ब्रह्म मुहूर्तावर होते. ब्रह्म मुहूर्तावर स्नान करून स्वच्छ कपडे घाला. मग एका चौरंगावर गंगाजल शिंपडून तो शुद्ध करा. आता शैलपुत्री मातेची मूर्ती किंवा फोटो चौरंगावर ठेवा आणि विधीपूर्वक कलश स्थापना करा.
पूजेतील फायदे
शैलपुत्रीच्या उपासनेमुळे चंद्रदोष दूर होतो, मनाची स्थिरता प्राप्त होते आणि कुटुंबात सुख-समृद्धी वाढते.