दिवाळीच्या उत्साहाने सर्वत्र उजळलेले वातावरण दिसत असून बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढालीला सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही लक्ष्मीपूजनाचा दिवस ठरवताना अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, कारण यंदा दोन दिवस अमावस्या आहे. 20 आणि 21 ऑक्टोबर 2025. वेदमूर्ती ज्योतिषाचार्य अनंत पांडव गुरुजी यांच्या मते, ज्या दिवशी प्रतिपदा वृद्धी तिथी लागू होते त्या दिवशी लक्ष्मीपूजन करणे शुभ मानले जाते.

दिवाळी 2025 मध्ये लक्ष्मीपूजन 20 की 21 ऑक्टोबरला करावे याबाबत संभ्रम आहे. वेदमूर्ती अनंत पांडव गुरुजी यांच्या मते, 21 ऑक्टोबर रोजी चित्रा नक्षत्र, बुधादित्य योग आणि शुभ तिथी असल्याने हा दिवस पूजनासाठी सर्वोत्तम आहे. जाणून घ्या पूजनाचा अचूक मुहूर्त.
दोन दिवसांची अमावस्या
अमावस्या तिथी या वर्षी 20 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3.44 वाजता सुरू होऊन 21 ऑक्टोबर संध्याकाळी 5.54 वाजता समाप्त होणार आहे. त्यामुळे दोन्ही दिवस अमावस्या असल्याने कोणता दिवस पूजनासाठी योग्य, हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.
पांडव गुरुजींचे मार्गदर्शन
वेदमूर्ती ज्योतिषाचार्य अनंत पांडव गुरुजी यांच्या मते, धर्मसिंधूनुसार प्रतिपदा वृद्धी तिथी असलेल्या दिवशी लक्ष्मीपूजन करणे अधिक शुभ ठरते. त्या दृष्टीने पाहता 21 ऑक्टोबर 2025, मंगळवार हा दिवस अधिक मंगलमय आहे.
ग्रहयोग आणि नक्षत्र
21 ऑक्टोबर रोजी चित्रा नक्षत्र असून, चंद्र तुला आणि कन्या राशींमध्ये भ्रमण करतो आहे. या दिवशी बुधादित्य राजयोग तयार होत असल्याने व्यापार, आर्थिक प्रगती आणि घरातील ऐश्वर्य वाढीसाठी हा दिवस विशेष फलदायी मानला गेला आहे.
लक्ष्मीपूजनाचे शुभ मुहूर्त
संध्याकाळी प्रमुख पूजन वेळ: 6.10 ते 8.40 (अडीच तास शुभ कालावधी)
सकाळचा मुहूर्त: 8.19 ते 10.32
दुपारचा मुहूर्त: 2.30 ते 4.08
गोधूलि मुहूर्त: 5.41 ते 7.32
स्थिर लग्न मुहूर्त: 7.26 ते 9.18
यंदा दोन दिवसांच्या अमावस्येतून प्रभावी ग्रहयोगांचा विचार करता 21 ऑक्टोबर 2025 हा दिवस शास्त्रोक्तदृष्ट्या सर्वोत्तम मानला जात आहे. या दिवशी संध्याकाळी शुभ मुहूर्तात लक्ष्मीपूजन केल्यास घरात संपन्नता, सौख्य आणि समृद्धी लाभेल, असे वेदमूर्ती यांनी सांगितले आहे.

